Website/वेबसाईट कुठून येते?
आपण जेंव्हा एखादी वेबसाईट उघडतो त्यावेळेस त्यात दिसणारी माहिती जसं कि अक्षर, इमेज, ऑडिओ आणि विडिओ फाईल हि आपल्या कॉम्पुटरवर किंवा मोबाईलवर नसते ती इंटरनेटद्वारे एका दुसऱ्या कॉम्पुटरवरून येते! वेबसाईटची ही माहिती मिळवण्यासाठी आपल्या कॉम्पुटरवरचं Browser/ब्राऊजर(जस कि इंटरनेट एक्सप्लोरर किंवा क्रोम) त्या दुसऱ्या कॉम्प्युटरसोबत संपर्क प्रस्थापित करायचा प्रयत्न करते!
आपल्याला एखाद्या व्यक्तीला संपर्क करायचा असल्यास पहिल्यांदा आपण आपल्या मोबाईलच्या कॉन्टॅक्टबुकमध्ये त्या व्यक्तीचं नाव टाकून शोधतो आणि मग फोन नंबर मिळवून त्या फोन नंबरद्वारे संपर्क प्रस्थापित करतो. म्हणजे भलेही आपल्याला नाव माहिती आहे पण संपर्क साधायला मात्र नंबरच लागतो, नाव तर लक्षात राहायला सोपं म्हणून वापरला जातं. अगदी तसंच ब्राऊजरला हा संपर्क साधण्यासाठी Domain Name/डोमेन नेम आणि IP Address/आयपी ऍड्रेसची गरज असते.
लक्षात राहायला सोपे म्हणून डोमेन नेम वापरला जातं जे आपण स्वतः ब्राऊजरला टाईप करून सांगतो आणि आयपी ऍड्रेस म्हणजे फोन नंबर जो ब्राऊजर स्वतः हुन मिळवतो आणि त्या दुसऱ्या कॉम्प्युटरला संपर्क करतो ज्यावरून आपली वेबसाईट येते. या दुसऱ्या कॉम्प्युटरलाच आपण वेब सर्वर किंवा होस्ट सर्वर असं म्हणतो.
या होस्ट सेर्व्हरबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊच पण त्याआधी डोमेन नेम काय असतं हे जाणून घेऊ.
![]() |
| Website kashi kaam kart | Website kashi chalte |
हे डोमेन नेम काय असतं?
![]() |
| उदाहरण हेतु दाखवली गेलेली आयकर विभागची साइट |
एक डोमेन नेम हे नेहेमी एकाच वेबसाइट्सशी निगडित असते आणि त्या डोमेन नेमचा वापर फक्त तीच वेबसाईट उघडण्यासाठी केला जाऊ शकतो.
IP Address/आयपी ऍड्रेस म्हणजे नक्की काय?
आयपी ऍड्रेस हा काही अंक आणि अक्षर मिळून बनलेला असतो जो खालीलप्रमाणे दिसतो 👇
192.168.174.1, fe80::87 e3:e7ea:120c:734f
खरं म्हणजे प्रत्येक कॉम्पुटर किंवा स्मार्टफोनला स्वतःचा आयपी ऍड्रेस असतो अगदी तुम्ही आता सध्या ज्या कॉम्प्युटर अथवा मोबाईलमधून हे वाचताय अगदी त्याचाही स्वतःचा एक आयपी ऍड्रेस असतो ज्याद्वारे इंटरनेटच्या मायाजालमध्ये त्या कॉम्प्युटरला ओळखलं जातं.
ब्राऊजरमध्ये मध्ये URL/Domain Name टाकल्यानंतर नक्की काय होतं?
प्रत्येक डोमेन नेम हे नेहेमी एका आईपी ऍड्रेसशी संबंधित असते. आपण डोमेन नेम क्रोम किंवा इंटरनेट एक्सप्लोररमध्ये टाकून जेंव्हा वेबसाईट उघडायचा प्रयत्न करतो त्यावेळेस ब्राऊजर, त्या डोमेन नेमशी संबंधित आयपी ऍड्रेस शोधण्याचा प्रयत्न करतो.
आपल्याला एखाद्या व्यक्तीला संपर्क करायचा असल्यास, पहिल्यांदा आपण आपल्या मोबाईलच्या कॉन्टॅक्टबुकमध्ये त्या व्यक्तीचं नाव टाकून शोधतो तसचं ब्राऊजरही एका विशिष्टप्रकारच्या कॉन्टॅक्ट बुकचा वापर करते ज्याला आपण DNS Server/डीएनएस सर्व्हर असं म्हणतो.
ब्राऊजर या डीएनएस सर्व्हरला इंटरनेटद्वारे Request/विनंती पाठवतो आणि त्या कडून आयपी ऍड्रेस मिळवतो. डीएनएस सर्व्हरला विनंती पोहोचण्यासाठी आपला कॉप्युटर इंटरनेटशी जोडलेला असणे आवश्यक आहे.
हे DNS Server/डिएनेस सर्वर काय प्रकार आहे?
DNS (Domain Name System/डोमेन नेम सिस्टिम) सर्वर एखाद्या फोनबूक/कॉन्टॅक्ट बुक सारखच काम करतं. हे दुसरा तिसरा काही नसून एक कॉम्पुटरच असतो जो दिवसरात्र चालू राहतो.
याच काम म्हणजे ब्राऊजरकडून विनंती आल्यानंतर ब्राऊजरने विचारलेल्या डोमेन नेमशी संबंधित आयपी ऍड्रेस काढून देणे. अख्ख्या जगात असे १३ DNS Servers आहेत जे ICANN म्हणजेच इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाइन्ड नेम्स एण्ड नंबर्स नावाची एक संस्था चालवते. हि संस्था 'ना नफा ना तोटा' या तत्वावर चालते जिचं मुख्य ऑफिस अमेरिकेत आहे आणि या संस्थेला जगातले जवळ जवळ सगळे देश मिळून चालवतात.
डीएनएस सर्वरकडून आयपी ऍड्रेस मिळाल्यानंतर पुढं काय होतं?
डीएनएस सर्व्हरकडून आपल्या कॉम्प्युटरवरच्या ब्राऊजरला मिळालेला हा आयपी ऍड्रेस आपल्याला एका विशिष्ट प्रकारच्या कॉम्प्युटरचा पत्ता सांगतो जो जगात कुठेही असू शकतो. या कॉम्प्युटरला आपण Web Server/वेब सर्वर किंवा Host Server/होस्ट सर्वर म्हणतो आणि या वेब सर्व्हरवरच आपल्या वेबसाईटची माहिती ठेवलेली असते.
जेंव्हा आपल्या कॉम्प्युटरवरच्या ब्राऊजरला आयपी ऍड्रेस प्राप्त होतो तेंव्हा ज्या Web Server/वेब सर्वरचा तो आयपी ऍड्रेस आहे त्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न ब्राऊजरकडून होतो. ब्राऊजरच्या या संपर्क करायच्या या प्रयत्नांना Request/रिक्वेस्ट असं बोललं जातं. या रिक्वेस्टमध्ये ब्राऊजर होस्ट सर्व्हरला वेबसाईटची माहिती मागतो जस कि वेबसाइटमधले चित्र, अक्षर, विडिओ आणि ऑडिओ.
हि रिक्वेस्ट वेब सर्वरपर्यंत पोहोचण्यासाठी आपला कॉम्प्युटर इंटरनेटला जोडलेला असणे आवश्यक आहे.
Web Server/वेब सर्वर किंवा Host Server/होस्ट सर्वर नक्की काय असतं?
वेब सर्वर हाही एक कॉम्पुटरच असतो जो दिवसरात्र चालू राहतो ज्याद्वारे जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून जर कोण्या ब्राऊजरकडून रिक्वेस्ट आली तर त्यावर कार्यवाही केली जावी.
यालाच होस्ट सर्वर बोललं जात कारण या कॉम्प्युटरवरच आपल्या वेबसाईटची सगळी माहिती साठवून ठेवलेली असते. याचाच अर्थ हा कॉम्प्युटर आपल्या वेबसाईटला होस्ट करतो. या कॉम्पुटरचाच आयपी ऍड्रेस डीएनएस सर्व्हरवर साठवला गेलेला असतो ज्याची ब्राऊजर डोमेन नेमच्या आधारावर डीएनएस सेर्व्हरला मागणी करतो.
ब्राऊजरकडून रिक्वेस्ट आल्यानंतर वेब सर्वर Response रिस्पॉन्स देतो ज्यामध्ये वेबसाईटची सगळी माहिती इंटरनेटद्वारे ब्राऊजरला पाठवली जाते.
हा वेब सर्वर जर बंद पडला तर आपली वेबसाईट ठप्प होते.
ब्राऊजरला रिस्पॉन्स मिळाल्यानंतर पुढे काय?
जशी ब्राऊजरला वेब सर्व्हरकडून संबंधित वेब साईटची माहिती मिळते तसं ब्राऊजर आपल्याला हवी ती वेब साईट उघडून देतो. एकदा वेबसाईट उघडली गेली कि पुन्हा आतल्या वेगवेगळ्या भागात पोहोचण्यासाठी पुन्हा वेब सर्व्हरला संपर्क केला जातो. अशा प्रकार वेबसाईट कार्यरत राहते.
![]() |
| वेबसाईट अश्याप्रकारे उघडली जाते! |
वरील माहिती आपण या खालील व्हिडिओ मधूनही जाणून घेऊ शकतो:



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा